रोजगार निर्मितीसाठी रिझव्र्ह बँकेच्या पुढाकाराने आजीवन अध्ययन विभागातर्फे विविध कार्यक्रम

अमरावती :- रिझव्र्ह बँकेमध्ये महिलांचा अधिकारी, कर्मचारी या वर्गामध्ये जास्तीत जास्त सहभाग असावा व त्यांची टक्केवारी वाढावी याकरीता रिझव्र्ह बँक नागपूर व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने अकरा महाविद्यालयांचा समावेश असलेला कार्यक्रम भारतीय महाविद्यालय राजापेठ, अमरावती येथे रिझव्र्ह बँकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. विचारपीठावर रिझव्र्ह बँक नागपूरचे सहायक व्यवस्थापक संजीव देसाई, सहायक सर्वेश कालेजवार, सत्यम सिंह, आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्रा. प्रशांत भगत, प्रा.वैभव जिसकार, प्रा. अर्चना ढोरे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुराधा वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री संजीव देसाई यांनी उपस्थित विद्यार्थीनींना बँकेचे व्यवहार धनादेश वटविणे, नेट बँकिंग, पेटीयम इत्यादी विषयी संपूर्ण माहिती देऊन बँकेमध्ये विद्यार्थीनी कशाप्रकारे नोकरीच्या संधी प्राप्त करु शकतात. याशिवाय परीक्षा कशी द्यावी, अभ्यास कसा करावा आदीविषयी सांगितले. सर्वेश कालेजवार यांनी बँकिंग व्यवहाराविषयी तांत्रिक माहिती देऊन नोकरीच्या माध्यमातून गरीब, होतकरु मुलींनी बँकिंग क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत विघे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे अनेक विद्यार्थीनींनी बँकिंग नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावण्याचे ठरविले.
प्रारंभी डॉ. प्रशांत भगत यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून कार्यशाळा आयोजनाविषयी प्रास्ताविकातून संपूर्ण माहिती दिली. संचालन डॉ. मिता कांबळे, आभार प्रा. वैभव जिसकार यांनी मानले. कार्यशाळेला भारतीय महाविद्यालयातील दोनशेवर विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील कर्मचा-यांनी अथक परीश्रम घेतले



