विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने तपोवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

अमरावती (दि. 02.03.2026) :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने तपोवन येथील महामना मालवीय विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त रासायनिक प्रात्यक्षिकांद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्याथ्र्यांनी विदर्भ महारोगी संस्था व पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याची माहिती घेतली.
तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांनी हृदयस्पर्शी भाषणातून पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या महान कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. ते पुढे म्हणाले, कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य समर्पित करणारे डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे केवळ वैद्यक तज्ज्ञ नव्हते, तर मानवतेचे पुजारी होते. त्यांनी कुष्ठरोग्यांना समाजात सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्वातंत्र्य संग्रामातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. एखाद्या कुष्ठरुग्णाच्या चेह-यावर हास्य उमटवू शकलो, तर तेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक आहे, हा त्यांचा संदेश विद्याथ्र्यांना प्रेरणादायी ठरला. कुष्ठरोग एक वैद्यकीय समस्या आहे, हा त्यांचा संदेश विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आला. कुष्ठरोग्यांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन करून डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या पाल्यांना शिक्षणाची दारे खुली करुन दिल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी विद्याथ्र्यांनी विविध रासायनिक प्रयोग सादर करून शाळेतील विद्याथ्र्यांना वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. विद्यार्थिनींनी महान महिला वैज्ञानिकांच्या वेशभूषेत सहभाग घेतला, त्यामध्ये कु. रेणुका नाले हिने बी. विजयालक्ष्मी, तर कु. वैष्णवी शुक्ला हिने मेरी क्यूरी यांची भूमिका साकारली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने झाली. तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनकार्यावर लिहिलेली पुस्तके देऊन डॉ. मनिषा कोडापे, डॉ. जागृती बारब्दे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. स्वाती गडखे, अनघा घुरडे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे सचिव श्री सहदेव गोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व तपोवन संस्थेचा परिचय संस्थेचे सहसचिव श्री ऋषिकेश देशपांडे यांनी करून दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला तपोवन संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सहकारी व पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.



