Latest NewsMaharashtra Politics

यवतमाळमध्ये उबाठा गटात अंतर्गत वाद उफाळले

नगरपरिषद पराभवानंतर शिवसैनिक आमनेसामने, तणावाचे वातावरण

यवतमाळ

यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, नगरपरिषद निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आज शिवसैनिक थेट आमनेसामने आले. पराभवाला जबाबदार कोण, यावरून झालेल्या वादामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आली नाही. या पराभवानंतर पक्षातील असंतोष उघडपणे समोर येऊ लागला आहे. माजी पदाधिकारी संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर या पराभवाची जबाबदारी टाकत उघड टीका केली होती.

या टीकेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय देशमुख यांच्या “शून्य” कामगिरीचा उपरोधिक सत्कार करण्याचा कार्यक्रम यवतमाळमधील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड हे शिवसैनिकांसह घटनास्थळी दाखल झाले.

या कार्यक्रमाला त्यांनी तीव्र विरोध करत संपूर्ण सोहळाच उधळून लावला. यावेळी शिवसैनिकांमध्ये जोरदार वाद झाला. दरम्यान, संतोष ढवळे यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असे असतानाही वादग्रस्त व खोचक कार्यक्रम आयोजित करून पक्षात गोंधळ निर्माण करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया उबाठा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे यवतमाळमधील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आगामी काळात पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button