बडनेरा रेल्वे स्थानकावर ₹२ कोटी ११ लाखांचे सोने चोरीला! हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये धाडसी चोरी

जळगाव येथील सराफा व्यापारी किशोर वर्मा यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. किशोर वर्मा हे दोन किलो ५०० ग्रॅम सोने घेऊन अमरावती येथे विक्रीसाठी आले होते. त्यापैकी ३०० ग्रॅम सोन्याची विक्री त्यांनी अमरावतीमध्ये केली. उर्वरित दोन किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे दोन कोटी अकरा लाख रुपये आहे, घेऊन ते हावडा-मुंबई एक्सप्रेसने परत जळगावकडे निघाले होते.
रेल्वेतून प्रवास करत असताना, बडनेरा रेल्वे स्थानकावर अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. ही चोरी लक्षात येताच, किशोर वर्मा यांनी तात्काळ बडनेरा येथील जीआरपी रेल्वे पोलिसात माहिती दिली.
या घटनेमुळे बडनेरा रेल्वे स्थानकावर सक्रिय असलेल्या चोरट्यांचे जाळे उघड झाले आहे. लहान-सहान चोऱ्यांसोबत आता कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करणारे मोठे चोरटेही सक्रिय झाले असल्याचे सिद्ध झाले आहे. रेल्वे पोलीस सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्यांची शहानिशा करत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या महागड्या वस्तूंच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.



