76 लाख ‘रहस्यमय’ मतांवर सुनावणी पूर्ण – मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उद्या!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्वांत मोठ्या वादग्रस्त प्रकरणांपैकी एक असलेल्या ७६ लाख रहस्यमय मतांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज (मंगळवार) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला असून, २५ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ही आकडेवारी आधीच्या निवडणूक आयोगाच्या आकड्यांशी जुळत नसल्याचा दावा याचिकाकर्ता चेतन अहिरे यांनी केला आहे.
- न्यायालयीन प्रक्रिया:
या प्रकरणाची सुनावणी ‘चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर’ या प्रकरणात झाली. - याचिकाकर्त्यांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २५ जून २०२५ रोजी निकाल देण्याचे जाहीर केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका:
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली ठाम भूमिका यापूर्वीच मांडली होती. त्यांनी म्हटले होते की,
“७६ लाख मतांची आकडेवारी ही केवळ एक चूक नसून, ती भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गहिरे प्रश्नचिन्ह निर्माण करते.”
त्यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम आणि निवडणूक नियमांच्या संदर्भात संयुक्तपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणताही पक्ष या लढ्यात सहभागी झाला नाही.
काय अपेक्षित?
या खटल्याचा निकाल २५ जून (बुधवार) रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही, यावर या निर्णयामुळे प्रकाश पडणार आहे.



